नवी दिल्ली : हिंदू धर्म आणि हिंदूत्वावरून काँग्रेस नेते शशी थरुर यांनी सध्याच्या राजकीय विचारसरणीवर टीका केली आहे. ”हिंदूत्व हे ब्रिटीश फुटबॉल संघाच्या गुंडासारखे आहे, अशी टीका केली आहे”, असे थरुर म्हणाले. थरूर यांनी बुधवारी नवी दिल्लीत त्यांच्या ‘प्राइड, प्रिज्युडिस अँड पंडिट्री: द एसेन्शियल शशी थरूर’ (अलेफ बुक कंपनी) या पुस्तकाचे प्रकाशन करताना ही टीका केली.
”सध्याची राजकीय विचारसरणी ही ब्रिटीश फुटबॉल टीमच्या गुंडागर्दीसारखी आहे. ही माझी टीम आहे, असं प्रत्येकजण सांगतो आणि तुम्ही दुसऱ्या टीमला पाठिंबा दिलात तर मी तुम्हाला मारेन, अशी धमकी दिले जाते” असं थरूर म्हणाले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. तसेच काही दिवसांपासून हिंदू धर्म आणि हिंदूत्वावरून टीका सुरू आहे. हिंदू धर्म हा हिंदूत्वापेक्षा वेगळा असल्याचं मत अनेकांनी मांडलं आहे. हिंदू धर्मात विविधता, सहिष्णुता, शंका, चौकशी आणि प्रश्न विचारण्याचे तत्वज्ञान आहे, असं अनेक राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देखील हिंदूत्वावरून टीका केली होती. हिंदू धर्म आणि हिंदूत्व एकच आहे का? एकच असेल तर मग याला दोन नाव का? तुम्ही फक्त हिंदूत्व शब्द का वापरत नाही? कारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असं राहुल गांधी म्हणाले होते. दरम्यान, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी देखील हिंदूत्वावरून टीका केली. या देशात हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या ८० टक्के लोकांनाच खरे भारतीय मानले जाते, असं ते म्हणाले होते.
Comment here