मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नोटीस पाठविल्याने महाविकास आघाडीचे दुसरे कॅबिनेट मंत्री ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. नारायण राणे यांच्या अटकेत अनिल परब यांची मोठी भूमिका होती. त्यामुळे परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याच्या शक्यता आहे. ईडीच्या नोटीसवर अनिल परब यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीच्या नोटीसबद्दल विचारले असतान अनिल परब म्हणाले की, ‘कशाबद्दल बोलावण्यात आले आहे, याबाबत ईडीच्या नोटिशीमध्ये सविस्तर उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याची माहिती घेऊन त्या नोटिशीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल.’ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘शाब्बास ! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ‘ईडी’ची नोटीस बजावण्यात आली,’ असे ट्विट करत ही माहिती दिली. ‘ईडी’कडून अनिल परब यांना नोटीस बजावली गेली असून त्यांना ३१ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, १०० कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल परब यांना समन्स बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. १०० कोटींच्या वसुलीमध्ये अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याही नावाचा उल्लेख असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी नारायण राणेंवर अटकेची कारवाईही झाली. मात्र त्याच दिवशी रात्री उशिरा महाड कोर्टाने त्यांना जामीन देखील मंजूर केला. मात्र राणेंना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी मोठी भूमिका बजावल्याची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर भाजपने परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
Comment here