City News

बारामती सहकारी बँकेसाठी राष्ट्रवादीचे पॅनेल जाहीर

बारामती -येथील बारामती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार प्रगती पॅनेलच्या उमेदवारांची आज घोषणा करण्यात आली. अजित पवार यांनी भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे नव्या जुन्यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मध्ये सचिन सातव, नुपूर वडूजकर, शिऱीष कुलकर्णी, कल्पना शिंदे, वंदना पोतेकर, उद्धव गावडे, देवेंद्र शिर्के, विजय गालिंदे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर विद्यमान अध्यक्ष श्रीकांत सिकची यांचे चिरंजीव मंदार सिकची, रणजित धुमाळ, जयंत किकले, डॉ. सौरभ मुथा, किशोर मेहता, नामदेवराव तुपे, रोहित घनवट यांना प्रथमच बारामती बँकेच्या संचालक पदासाठी संधी अजित पवार यांनी दिली आहे.
बारामतीच्या राजकारण व अर्थकारणाच्या दृष्टीने बारामती बँक (Baramati Bank) ही महत्वाची मानली जाते. या बँकेचे कार्यक्षेत्र सहा जिल्ह्यात विस्तारले असून बँकेच्या 36 शाखा आहेत. या बँकेवर संधी मिळविण्यासाठी तब्बल 105 जणांचे अर्ज दाखल झाले होते. सोमवारी (ता. 6) अजित पवार यांनी मुलाखती घेत सर्वांचे मत जाणून घेतले होते, त्यानंतर आज या बाबतची घोषणा करण्यात आली. अजित पवार यांनी बँकेसाठी घेतलेल्या सभेतच जुन्या नव्यांचा मिलाफ करण्याचे सूतोवाच केले होते, त्या नुसार बँकेवर आठ जुन्या तर सात नवीन चेह-यांना संधी मिळाली आहे.

Comment here