World

उत्तर कोरियाकडून रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी

युक्रेन-रशिया युद्धात अमेरिका आणि त्याचे मित्र देश व्यस्त असताना उत्तर कोरियानं महिनाभरानंतर शनिवारी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केलीय. त्यांनी समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. दक्षिण कोरियाच्या सैन्यानं या दाव्याची पुष्टी केलीय.
उत्तर कोरियाची ही नव्या वर्षातील आठवी क्षेपणास्त्र चाचणी आहे. याआधी 30 जानेवारीला चाचणी करण्यात आली होती. त्याच्या जवळपास महिन्याभरानंतर पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आलीय. काही तज्ञांचं म्हणणं आहे की, उत्तर कोरिया आपले शस्त्रास्त्र तंत्रज्ञान सुधारण्यावर भर देत असून याद्वारे अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबतचं वृत्त रॉयटर्सकडून देण्यात आलंय. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी उत्तर कोरिया युक्रेन-रशिया संघर्षात अमेरिकेच्या सहभागाचा वापर करून चाचण्या वाढवू शकतो, असं काही तज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी सांगितलं की, उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र पूर्व किनारपट्टी आणि जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर पडण्यापूर्वी त्याने सुमारे 600 किलोमीटर उंचीवर सुमारे 300 किलोमीटरपर्यंत उड्डाण केले होते. दरम्यान, या चाचणीमुळं जहाजे किंवा विमानांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितलंय. दक्षिण कोरियाच्या अधिकार्‍यांनी उत्तर कोरियाच्या राजधानीच्या भागातून क्षेपणास्त्र चाचणी झाल्याची पुष्टी केलीय.

Comment here