City News

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांनी आचाऱ्याला मारहाण करून लुटले

नागपूर : दुचाकीने घरी जाणाऱ्या आचाऱ्याला हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी अडविले. त्याला मारहाण करीत खिशातील पाच हजार रुपये हिसकावले आणि दमदाटी करून घरी पाठवले. पोलिसांनीच लुटमार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी आचाऱ्याने परिमंडळ चारचे उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कृष्णकांत दुबे (रा. म्हाळगीनगर) असे या आचाऱ्याचे नाव आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगष्टला कृष्णकांत दुबे हे बुटीबोरी येथे स्वयंपाक करण्यासाठी गेले होते. रात्री अडीचच्या सुमारास ते दुचाकीने घरी जात होते. शुभांगीनगर येथून जात असताना दुबेच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. दुचाकी ढकलत नेत असताना रात्रपाळी गस्तीवर असलेले हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील वादग्रस्त पोलिस हवालदार मनोज नेवारे आणि पोलिस शिपाई चंद्रशेखर कौरती यांनी त्याला अडविले. चौकशी करून काठीने त्याला मारहाण केली.पोलिस ठाण्यात आणून त्याच्या खिशात असलेले कामाचे ५ हजार रुपये पोलिस कर्मचाऱ्यांनी काढून घेतले. त्यानंतर दुबे यास ७० रुपये परत केले. त्याच्या दुचाकीत थोडे पेट्रोल टाकून घरी पाठविल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे. याप्रकरणी दुबे यांनी गुरुवारी परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डॉ. शिंदे यांनी सहायक पोलिस आयुक्त डॉ. पालवे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. पालवे यांनी लगेच तपासाला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी त्या परिसरातील आणि पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी घेतल्याची माहिती आहे. पोलिसांचे प्रकरण असल्याने पोलिस हे प्रकरण दडपण्याच प्रयत्न करीत असल्याचे सूत्राने सांगितले.

दुबे यांनी याबाबत आमच्याकडे लेखी तक्रार केली आहे. सहायक पोलिस आयुक्त पालवे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. तपासाचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
– डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपायुक्त

Comment here