City News

नागपूर : देशांतर्गत विमानाने येणाऱ्यांचे काय?

नागपूर : थेट विदेशातून विमानाने नागपुरात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा सात दिवसांनी त्यांची चाचणी होणार आहे. परंतु विदेशातून दिल्ली किंवा मुंबईला आल्यानंतर देशांतर्गत विमानाने नागपुरात आलेल्या प्रवाशांच्या चाचणीबाबत अद्यापही काही स्पष्ट नाही. विदेशातून आलेल्यांची माहिती केवळ शेजारी नागरिकच महापालिकेला देऊ शकेल. त्यामुळे विदेशातून आलेल्यांना ‘ट्रेस’ करण्याचे महापालिकेपुढे मोठे आव्हान आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉनने जगातील अनेक देशात दहशत माजली आहे. त्यामुळे देशातही सतर्कता बाळगण्यात येत आहे. विशेषतः विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या विमानतळावरच करण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून याबाबत महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे. महापालिकेने शहरात विदेशातून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची कोरोना चाचणी करणे यापूर्वीच सुरू केले असून नियमित चाचणी करण्यात येत आहे. ओमीक्रॉनमुळे महापालिका विदेशातून थेट शहरात येणाऱ्यांच्या चाचण्याबाबत आणखीच गंभीर झाली आहे. परंतु खरे आव्हान विदेशातून दिल्ली, मुंबईसारख्या शहरात आल्यानंतर देशांतर्गत विमानाने नागपुरात येणाऱ्यांना ‘ट्रेस’ करण्याचे आहे. विदेशातून थेट नागपुरात आलेल्यांची विमानतळावर चाचणी करण्यात येणार आहे. यात पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशाला विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

निगेटिव्ह आढळलेल्या प्रवाशांची पुन्हा सात दिवसानंतर तपासणी करण्यात येणार आहे. विदेशातून दिल्ली, मुंबईला आल्यानंतर तेथील विमानतळावर चाचणी केली जाईल. त्यानंतर देशांतर्गत विमानाने संबंधित प्रवाशांचा नागपूरला येण्याचा मार्ग मोकळा होईल. परंतु नागपूरला आल्यानंतर संबंधित व्यक्ति विदेशातून आल्याबाबतची माहिती कशी मिळणार? सात दिवसांची त्याची चाचणी कशी करणार? असा पेच महापालिकेपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यासाठी नागरिकांनी दिलेल्या माहितीवरच महापालिकेला विसंबून राहावे लागणार आहे. विदेशातून आलेल्या नागरिकाची माहिती शेजारी नागरिकांनी द्यावी, अशी अपेक्षा महापालिका करीत आहे. अर्थात शेजारी व्यक्तीने माहिती न दिल्यास विदेशातून व्हाया देशांतर्गत विमानाने नागपुरात आलेला प्रवासी शहरात बिनधास्त फिरण्याची शक्यता आहे. या प्रवाशाला `ट्रेस’ करण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे.

५ डिसेंबरला थेट नागपुरात येणार विदेशातून विमान

यूएईमधून ५ डिसेंबरला थेट नागपुरात विमान येणार आहे. यात १६८ प्रवासी राहणार असून विमानतळावर सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. यातील पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधिताला थेट आमदार निवासात विलगीकरणात पाठविण्यात येईल. निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तींची पुन्हा सात दिवसांनी चाचणी करण्यात येईल, असे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.
“विदेशातून थेट शहरात आलेल्या विमानप्रवाशांची विमानतळावरच चाचणी करण्यात येईल. परंतु विदेशातून दुसऱ्या शहरात आल्यानंतर तेथून देशांतर्गत विमानसेवेचा लाभ घेत नागपुरात आलेल्या प्रवाशांबाबत त्यांचे शेजारी किंवा नागरिकांनी महापालिकेला माहिती द्यावी.”
– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Comment here