City News

शिवसेना, NCP आणि काँग्रेसचं सरकार कसं झालं?, पवारांनी दिलं उत्तर

महाविकास आघाडी सरकार कसं स्थापन झालं, याचा खुलासा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांन एका मुलाखतीत केला. ‘इंडिया टुडे’चे मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त शरद पवारांची राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र कसे आले, याबाबत भाष्य केलं.

उद्धव ठाकरेंच्या गुणांचं कौतुक करताना शरद पवारांनी, बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवली. असं विधान केलं. भाजपसोबत शिवसेना सरकार स्थापन करणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही दुसऱ्या चॅनलने शिवसेनेसोबत चर्चा सुरू केली, असा गौप्यस्फोटही शरद पवारांनी केला. यामध्ये संजय राऊत यांची भूमिका महत्वाची असल्याचेही पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना सोनिया गांधी याच्यासोबतही चर्चा करण्यात आली. शिवसेना-भाजप सरकार होत नसल्याचं आमच्या लक्षात आल्यानंतर सर्व आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा विचार केला. त्याप्रमाणे बोलणी झाली. काँग्रेसमधील काही नेत्यांनीही याला दुजोरा दिला. सर्वांनी तयार केलेल्या फॉर्म्युल्यास सोनिया गांधी यांनीही होकार दिला. त्यानंतर राज्यात भाजप सत्तेपासून दूर राहिलं. यावेळी मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याबद्दलच्याही प्रश्नाला उत्तर दिलं. ‘मला प्रशांत किशोरची मदत घेण्याची गरज नाही. सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे पवारांनी स्पष्ट केले.’

काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखा –

काँग्रेसच्या सद्यस्थितीकडे कसे बघता, या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर प्रदेशचं उदाहरण देत किस्सा सांगितला. काँग्रेस सध्या जुन्या जमिनदारासारखी झाली आहे. कमाल जमीन धारण कायदा आल्यानंतर जमीनदारांकडील जमिनी गेल्या. ते रोज सकाळी हवेलीच्या बाहेर आल्यावर म्हणतात, ही सगळी जमीन आपली होती. हवेलीचा खर्च करण्याची शक्ती आता त्यांच्यात राहीलेली नाही. आता त्यांना जुळवून घ्यावं लागेल.

‘EDमुळे सरकार आणखी भक्कम’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीच्या कारवायांवर चौफेर टीका केली. ईडीच्या कारवाया या आकसबुद्धीने सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसंच या कारवायांमुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यांच्या नेतृत्वातलं सरकार आणखी भक्कम बनतंय. त्यामुळे सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नाही, असं शरद पवार मुंबई तकशी बोलताना म्हणाले.

Comment here