City News

Pune Family on Picnic, Mother Son Found Dead, Father Missing

पुणे, 16 June. : पुण्याजवळील सासवडमध्ये काल (मंगळवारी) सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचं उघड झालं आहे. महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचं नाव अयान शेख आहे. पिकनिकसाठी घराबाहेर पडलेल्या या कुटुंबातील मायलेकाची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आलिया यांचे पती आबीद शेखही गायब असल्यामुळे गुंता वाढला आहे. हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे आहे. चार दिवसांपूर्वी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्यासाठी ब्रिझा कार भाड्याने घेतली होती. हे कुटुंब पिकनिकसाठी बाहेर पडलं खरं, पण काल सकाळी सासवड गावात आलिया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला.

कात्रज बोगद्यालगत मुलाचाही मृतदेह : सासवड पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत आठ ते दहा वर्षांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला. कात्रज पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच काल सकाळी सासवडला ज्यांचा मृतदेह आढळून आला, त्या आलिया यांचा तो अयान नावाचा मुलगा असल्याचं उघड झालं.

कार पुणे-सातारा रस्त्यावर सापडली
: दुसरीकडे, आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रिझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर सोडून दिल्याचं आढळून आलं आहे. आबीद शेख हे एका कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतात. पिकनिकसाठी घराबाहेर पडल्यानंतर नेमकं काय झालं? आई-मुलाची हत्या का झाली? तसंच आबीद शेख कुठे आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत. आबीद शेख यांचा ठावठिकाणा लागल्यावरच या प्रकरणावरुन पडदा उठेल. मात्र तूर्तास या दुहेरी हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

Comment here