City News

पैठण : बाजार समितीची निवडणूक रद्द

पैठण : बाजार समितीमध्ये मतदार असलेल्या सेवा सोसायटींच्या संचालक पदांची निवडणूक पहिली घ्यावी, नंतर बाजार समित्यांची निवडणूक घेण्यात यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक सहकार प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची ता. १७ जानेवारी २०२२ रोजी जाहीर झालेली निवडणूक रद्द झाली आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार आता पैठण तालुक्यातील मुदतपात्र किमान ७० सोसायट्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. परिणामी, न्यायालयाच्या आदेशामुळे आधी लगीन सोसायट्यांचे नंतर बाजार समितीचे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण १८ संचालक पदे आहेत. यामध्ये सर्वात जास्त संचालक संख्या सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ११ संचालक आहेत. तर ग्रामपंचायत मतदारसंघात ४, व्यापारी व अडते मतदारसंघात २ तसेच हमाल मापाडी मतदारसंघात १ संचालक व व्यापारी मतदार संघात २ अशी संचालक संख्या आहे. सोसायटी मतदार संघात मतदार संख्या एक हजार ८७ तर ग्रामपंचायत मतदार संघातील मतदार संख्या एक हजार ३२ आणि हमाल मापाडी मतदार संघातील मतदार संख्या ६०४ आहे. दरम्यान, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार सध्या मतदार यादीवर आक्षेप, हरकती सुरु आहेत. मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे सुरु असल्याने सुनावणीनंतर अंतिम मतदारसंख्या जिल्हा उपनिबंधकांकडून निश्चित होईल.

पोट निवडणुकीमुळे ग्रा.पं. सदस्यांना संधी
पैठण तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमध्ये १५ जागांसाठी पोट निवडणुका होणार आहेत. यासाठी २१ डिसेंबरला मतदान होत आहे. त्यामुळे किमान नव्या सदस्यांना मतदाराचा हक्क बाजार समिती निवडणुकीत बजावता येणार आहे. मतदार यादीची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविल्या जाण्याची शक्यता असल्याचे सहकार सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुका मार्चपर्यंत लांबण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

न्यायालयाच्या निर्देशामुळे पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्या अगोदर मुदत पात्र सोसायटीच्या निवडणूका घेण्यात येणार आहे.
– अनिल पुरी, सहायक निबंधक, तालुका सहकारी संस्था, पैठण.

Comment here