City News

दोन्ही डोस नसतील; तर प्रवेश नाकारा

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत असल्याने संसर्गाचा धोका वाढणार आहे. त्यामुळे लस घेतलेली नाही, त्यांना पेट्रोल पंप, धान्य दुकान, उद्योग- व्यवसाय या ठिकाणी प्रवेश नाकारला जावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले.जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी संपूर्ण लसीकरण बंधनकारक असून प्रत्येक नागरिकाने संपूर्ण लसीकरण करून घेणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे याबरोबरच शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. रेखावार म्हणाले,
‘‘कोविड प्रतिबंधासाठी लशीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. अद्यापही पहिला डोस घेतला नाही, अशा १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनी त्वरित पहिला डोस घ्यावा. दुसरा डोसही विहीत कालावधीत घ्यावा. मास्क नाही; प्रवेश नाही हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आला. आता याच पद्धतीने संपूर्ण लसीकरण नाही तर प्रवेश नाही, हा उपक्रम देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच खासगी आस्थापना, दुकानदार, घाऊक व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, एमआयडीसी, पेट्रोल पंप, रेशन दुकानदार यांनी त्यांच्या आस्थापनाच्या ठिकाणी ठळक अक्षरात ‘संपूर्ण लसीकरण नाही तर प्रवेश नाही’ अशा आशयाचे फलक लावावेत. खरेदीसाठी वा अन्य कारणांसाठी येणाऱ्यांकडे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करूनच त्यांना सेवा द्यावी.’’
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दंडात्मक कारवाई

रेखावार म्हणाले, ‘‘ओमिक्रॉन व्हेररियंटची घातकता लक्षात घेता मास्कचा वापर अनिवार्य आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून शासनाने निर्धारित केलेला दंड वसूल केला जाईल. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्था, आस्थापना दंडास पात्र असतील. कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी ५०० रुपये दंड करण्यात येईल. प्रसंगी संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा दहा हजार रुपये दंड करण्यात येईल. संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच नियमांचे पालन केले नाही, तर ५० हजार रुपये दंड करण्यात येईल. खासगी वाहनात नियमांचे पालन होत नसेल तरीही दंडात्मक कारवाई केली जाईल.’’

Comment here