NationalState News

‘मी भाजपात प्रवेश केला नाही म्हणून मला तुरुंगात टाकलं’

बेळगाव (कर्नाटक) : सध्या कर्नाटकात विधान परिषदेच्या निवडणुकांना रंग चढला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आपण भाजपाला (BJP) कधीच पाठिंबा दिला नाही, तसेच भाजपात प्रवेशही केला नाही, त्यामुळं त्यांनी मला 50 दिवस तिहार तुरुंगात ठेवलं होतं, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सोमवारी बेळगावात केला. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.
डीके शिवकुमार म्हणाले, राज्यातील भाजपा सरकार (BJP Government) देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. मी तिहार तुरुंगात गेलो, कारण भाजपानं मला पाठवलं. मी भाजपला पाठिंबा दिला नाही, त्यांच्यासोबत गेलो नाही, त्यामुळं त्यांनी मला तुरुंगात टाकलं, असा आरोपही शिवकुमारांनी भाजपवर केलाय. शिवकुमार तिहार तुरुंगात का गेले होते, असा सवाल भाजपा नेत्यांनी केला होता. त्यावर डीकेंनी प्रत्युत्तर दिलंय.
डीके पुढे म्हणाले, सर्व काही सर्वांना माहित आहे आणि त्याचं रेकॉर्ड देखील आहे. कर्नाटकातील सध्याचं भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. त्यामुळं राज्याचा विकास खुंटलाय. भाजप काँग्रेस नेत्यांना विविध गुन्ह्यांत अडकविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, डीके शिवकुमार यांना ईडीनं 3 सप्टेंबर 2019 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होतं. त्याच वर्षी 23 ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

Comment here