City News

औरंगाबाद : वीस दिवसात परदेशी प्रवास केलेल्यांची माहिती कळवा

औरंगाबाद : कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन घातक विषाणूचा प्रकार दक्षिण आफ्रिकेत आढळून आल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. यापार्श्‍वभूमीवर विमानाद्वारे परदेशातून गेल्या २० दिवसात शहरात आलेल्या प्रवाशांची माहिती कळविण्याची सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी (ता. २९) विमानतळ प्राधिकरणाला केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक निमित गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक डी. जी. साळवे, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, जिल्हा कोविड नियंत्रण कक्षाचे डॉ. विजयकुमार वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरीन फातेमा उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी विमान प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, अथवा ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस घ्यायलाच हवी. विमान प्राधिकरणानेही कोरोना प्रतिबंधक लस बाबतची तपासणी करावी. आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबतच्या प्रवासाची माहिती विविध विमान कंपन्यांशी संपर्क साधून प्राप्त जिल्हा प्रशासनाला कळवावी. तसेच नागरिकांनी नियंत्रण कक्ष (दूरध्वनी 0240-2331077) व महापालिकेच्या कोरोना वॉर रूमला (दूरध्वनी 8956306007) माहिती कळवावी, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

Comment here