Business & AuctionsNationalState News

प्रतिक्षा संपली ! या तारखेपासून मिळेल Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर्स

भारतातील चर्चित इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 व Ola S1 Pro ची ग्राहकांना प्रत्यक्ष मिळण्यास सुरुवात होणार आहे. बंगळूरु येथील मोबिलिटी फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवर नवीन डिलिव्हरीची तारीख जाहीर केली आहे. याच महिन्यापासून ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगला सुरुवात होईल. या स्कूटरची बुकिंग याच वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु झाली होती. तेव्हापासून ओला टेस्ट राईड आणि प्रत्यक्ष ग्राहकांना मिळण्याच्या तारखांमध्ये बदल होत आला आहे. मात्र आता ती प्रत्यक्ष मिळण्याच्या तारखेची घोषणा केली गेली आहे. भारतात कंपनीने गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या टेस्ट राईड सुरु केल्या होत्या. कंपनीने माहिती दिली की गेल्या महिन्यापासून आतापर्यंत ओला एस वन व एस वन प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राईड २० हजारांपर्यंत पूर्ण केली आहे. त्यानंतर कंपनीने आता १०० शहरांमध्ये दररोजचे लक्ष्य १० हजार टेस्ट राईड करण्याचे ठेवले आहे. सीईओ भाविश अग्रवाल यांनी माहिती देताना म्हणाले, गुरुवारपर्यंत ओलाला आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी १० लाख रिझर्व्हेशन मिळाले आहे.

नोव्हेंबरमध्ये आणखी पाच शहरांमध्ये टेस्ट राईड
ओला इलेक्ट्रिकने १० नोव्हेंबरला बंगळूरु, दिल्ली, अहमदाबाद आणि कोलकात्यात टेस्ट राईडची सुरुवात केली होती. पुन्हा १९ नोव्हेंबर रोजी चेन्नई, हैदराबाद, कोची, मुंबई आणि पुणे या आणखी पाच शहरांमध्ये राईडची सुरु करण्यात आली होती. आता कंपनी अधिकाधिक बुकिंग आणि टेस्ट राईडची संख्या वाढवत आहे.

इतकी असेल किंमत
कंपनीने १५ ऑगस्ट रोजी ओला एस १ इलेक्ट्रिक स्कूटरला दोन व्हेरिएंट, एस १ आणि एस १ प्रो मध्ये सादर केले होते. त्यांची किंमती ९९ हजार ९९९ आणि १ लाख २९ हजार ९९९ रुपये आहे. या स्कूटर्सची विक्री ८ सप्टेंबर रोजी सुरु होणार होती. मात्र त्यानंतर एक आठवड्यासाठी ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक महिन्याला तिच्या विक्रीची तारीख पुढे ढकलली गेली. मात्र आता १५ डिसेंबरपासून ती ग्राहकांना प्रत्यक्ष मिळेल. ओला एस १ ची गती १२१ किलोमीटर असून तिचे टाॅप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. दुसरीकडे ओला एस १ प्रोची १८१ किमी गती असून तिची टाॅप स्पीड ११५ किमी प्रतितास आहे. स्कूटरला ब्लॅक, पिंक, येलो, ब्लू, व्हाईटसह एकूण १० रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येऊ शकेल.

Comment here