City News

विनायक मेटेंच्या औरंगाबादेतील बैठकीत गोंधळ, एक लाखांची चेन लंपास, नऊ जणांवर गुन्हे

औरंगाबाद : शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांना शिवीगाळ करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबादेत शिवसंग्रमाच्या बैठकीत गोंधळ घातल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विनायक मेटे यांच्या पडेगाव येथील बैठकीत शिवीगाळ करत आरोपी अंगावर धावून गेल्याचा आरोप आहे. आरोपींपैकी एकाने गळ्यातील एक लाख रुपयांची चेन लंपास केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये होणारा संघर्ष मेळावा उधळून लावण्याचा राज्य सरकारचा कट असल्याचा संशय मेटेंनी व्यक्त केला आहे.

विनायक मेटे काय म्हणाले होते? ठकीत झालेल्या गदारोळामुळे विनायक मेटे यांना बैठकीतून बाहेर पडावं लागलं होतं. या गदारोळानंतर मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला होता. “शिवसंग्रामच्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या गावगुंडांची आम्ही तक्रार केली आहे. या गावगुंडांना अटक नाही झाली तर परवाच्या मेळाव्यात आम्ही निर्णय घेऊ. ही सरकारची गुंडगिरी आहे. आम्ही सहन करणार नाहीत. स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही गप्प आहोत याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या असा होत नाही” अशा शब्दात मेटे यांनी रोष व्यक्त केला होता.

नेमकं काय घडलं? औरंगाबाद येथील पडेगाव येथे 24 जून रोजी शिवसंग्रामची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे हे देखील उपस्थित होते. शिवसंग्रामच्या मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बैठक सुरु असताना अचानक तिथे काही जण दाखल झाले. त्यांनी प्रचंड गोंधळ घालत बैठक बंद पाडली. भाजपचे सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा प्रश्न विचारत त्यांनी बैठकीत गोंधळ घातला. या गोंधळावरुन विनायक मेटे यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

मेटे यांचा पोलिसांवरही आरोप “बीडचा मोर्चा काढल्यानंतर पोलिसांचं वर्तन बदललं आहे. मला 25 वर्षे झालं संरक्षण आहे, पण मी मुंबईतून बाहेर पडलो की माझं संरक्षण काढून घेण्यात येत आहे. याबाबत मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं आहे”, असं विनायक मेटे म्हणाले.

Comment here