City News

Work hard you have more work to do said PM Modi to Bhagwat karad.

औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांना परिवारासह बोलावून अर्धा तास वेळ दिला. कौटुंबिक माहिती घेत मराठवाड्यातील परिस्थिती, जनआशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद, वित्त मंत्रालयातील कामकाजाचा अनुभव जाणून घेत मेहनत घ्या, तुम्हाला खूप काम करायचे आहे, अशा शब्दांत प्रोत्साहन दिले. भाजपचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेला मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंगळवारी (ता.३१) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली.

मोदी यांनी कराड परिवाराला अर्धा तास वेळ दिला. मुलगा हर्षवर्धनने फोटो काढताना मास्क काढण्याबाबत विचारले तेव्हा दोन डॉक्टर असताना आम्ही बिनधास्त असल्याची विनोदी टिपणीही मोदी यांनी करत डॉ. कराड यांच्या नातीला चॉकलेटही भेट दिले. मराठवाड्यात जनआशीर्वाद यात्रेदरम्यान परभणी जिल्ह्यातील निळागावचे शेतकरी दत्तराव सोळंके यांनी दिलेला फेटा तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे आभार पत्र आणि माता भगिनींनी पाठवलेल्या राख्या डॉ. कराड यांनी मोदी यांच्याकडे दिल्या. औरंगाबादची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख असलेली हिमरू शालही दिली. तेव्हा ही काश्मीरमधील शाल आहे का? असा प्रश्‍न केला. डॉ. कराड यांनी औरंगाबादमधील या शालीची माहिती देऊन अजिंठा, वेरूळ लेण्याप्रमाणे तिचे वेगळे महत्त्व असल्याचे सांगितले. डॉ. कराड यांच्या समवेत पत्नी डॉ. अंजली, मुलगा हर्षवर्धन, वरुण व सून रश्मी आणि नात आविशा होते.

Comment here