City News

नागपूर : जि.प.च्या सर्व शाळांमध्ये लागणार संविधान स्तंभ

नागपूर : भारतीय संविधानाची माहिती शाळकरी मुलांना व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये संविधान स्तंभ लावण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पारशिवनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारशिवनी, पारशिवनी तालुक्यातीलच गरांडा प्राथमिक शाळा व रामटेक तालुक्यातील वडंबा शाळेत आधीच अशा प्रकारचे स्तंभ लावले आहेत. सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ सदस्या शांता कुमरे यांनी जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांना संविधानाविषयी माहिती मिळावी, संविधानाचे महत्त्व कळण्यासाठी जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक व हायस्कूल शाळांमध्ये संविधान स्तंभाची उभारणी करण्याचा ठराव मांडला. त्याला सत्तापक्षासोबतच विरोधी पक्षातील सर्वच सदस्यांनी अनुमोदन दिले.
यावर अध्यक्षा बर्वे यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे २०१६ मध्ये पारशिवनी जि.प. शाळा, २०२० मध्ये पारशिवनी तालुक्यातीलच गरांडा जि.प. शाळा व आता यंदा रामटेक तालुक्यातील वडंबा जि.प. शाळा येथे प्रवेशद्वारापुढेच भारतीय संविधान स्तंभाची निर्मिती केली आहे. ती सर्वच शाळांमध्ये करण्यात येणार. यामुळे शाळेत प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतिमा दिसेल.

आजच्या पिढीतील मुलांना महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार करावा. पुढे होऊ घातलेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव निधीसाठी जिल्हा नियोजन समितीपुढे ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Comment here