City News

काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष? राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कार्यकारिणीची (काँग्रेस वर्किंग कमिटी) बैठक होणार आहे. बैठकीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह लखीमपूर खेरी, शेतकरी आंदोलन, भाववाढ आणि पक्षांतर्गत निवडणुका यावरही चर्चा होणे अपेक्षित आहे. एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीचे वेळापत्रक राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मध्ये सादर केले जाऊ शकते.नाराज काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर आणि पंजाबमध्ये कलह वाढल्यानंतर अनेक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची बैठक घेण्याची मागणी केली. ज्या प्रकारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकण्यात आले आणि नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावरून नाराज नेते टीका करत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या बैठकीत या विषयांवरही चर्चा केली जाईल.

गेल्या काही दिवसांपासून असंतुष्ट नेत्यांचे आवाज थंडावले आहेत. ज्येष्ठ नेते अंबिका सोनी आणि कमलनाथ सतत असंतुष्ट नेत्यांना भेटत आहेत आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे बैठकीत नाराज नेते आक्रमक होणार नाही, असे सांगितले जात आहे. परंतु संघटनात्मक निवडणुकीच्या मागणीवर हे नेते जोर देतील. मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक, पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत ही पक्षांतर्गत निवडणूक पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे.

Comment here