City News

औरंगाबाद : वॉर्डांच्या नावासह सीमारेषा बदलणार

औरंगाबाद : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ११ ने वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डांमध्ये बदल होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या वॉर्डांच्या नावासह सीमारेषा देखील बदलण्याची शक्यता आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या नऊ प्रभागांमध्ये प्रत्येक एक वॉर्ड वाढेल, विस्तारित भागातच जास्त वॉर्ड होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.औरंगाबाद शहराच्या वाढीव लोकसंख्येनुसार महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी (ता. २७) घेतला. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या ११५ वरून १२६ वर जाणार आहे. अकरा नगरसेवकांची भर पडणार आहे. नवे वॉर्ड तयार होणार असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या वॉर्डांच्या सीमारेषा आणि वॉर्डांची नावे देखील बदलणार आहेत. तसेच प्रत्येक वॉर्डाचे क्षेत्रफळ कमी होईल, वॉर्ड लहान आकाराचे होतील. लोकसंख्या व मतदारांची संख्यादेखील कमी राहणार आहे. महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार आहे. त्यामुळे तीन वॉर्डांचा एक प्रभाग होईल. ४२ प्रभागांचा विचार करता एका प्रभागाची लोकसंख्या सरासरी २९ हजार असेल. त्यात दहा टक्के वाढीची आणि दहा टक्के कपातीची देखील तरतूद ठेवण्यात आली आहे. दहा टक्के वाढीचा विचार केल्यास एक प्रभाग ३२ हजार १६१ लोकसंख्येचा असेल. त्यात साडेचार ते पाच हजार मतदार असतील, असे सूत्रांनी सांगितले.

या भागात वाढतील वॉर्ड :
अकरा वॉर्ड शहराच्या विस्तारित भागातच वाढण्याची शक्यता आहे. सातारा-देवळाई, पडेगाव, मिटमिटा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, हर्सूल, नारेगाव, मसनतपूर, चिकलठाणा, मुकुंदवाडी, भीमनगर-भावसिंगपुरा हा शहराचा विस्तारित भाग आहे. त्यामुळे या भागांचा वॉर्ड वाढविताना विचार होणार आहे. प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात एक नवीन वॉर्ड तयार होईल तर दोन झोन कार्यालयांच्या क्षेत्रात प्रत्येकी दोन वॉर्ड नव्याने तयार होतील, असे सूत्रांनी सांगितले.

Comment here