National

बँक कर्मचारी दोन दिवसीय संपावर, कामकाजावर होणार परिणाम

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे जवळपास ९ लाख कर्मचारी आजपासून दोन दिवसीय संपावर आहेत. बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात संप पुकारण्यात आला असून बँका नफ्यात असतानाही खासगीकरण का? असा सवाल युनायटेड फोरम इंडियाने उपस्थित केला आहे. त्यामुळे दोन दिवस बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.
गेल्या २०२१-२२ च्या बजेटमध्ये सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. त्याविरोधात बँक संघटनांनी हा संप पुकारला असून यामध्ये ९ संघटनांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त मुख्य कामगार आयुक्तांसोबत बँक संघटनांची बैठक घेण्यात आली. मात्र, ही बैठक अपयशी ठरली. त्यामुळे बँक संघटना आपल्या संपावर ठाम असल्याचे ऑल इंडिया बैंक ऑफिसर्स कनफेडरेशच्या महासचिव सौम्य दत्ता यांनी सांगितले. दोन दिवसीय संपादरम्यान बँकेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असे स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकानी आपल्याला ग्राहकांना यापूर्वीच सांगितले आहे.

संप मागे घेण्याची विनंती –
यापूर्वी, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सह अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली. तसेच दोन दिवसीय देशव्यापी संपावर जाण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन बँक संघटनांना केले आहे. एसबीआयने देखील ट्विट करत कोरोना महामारी सुरू असून संपामध्ये सहभागी होणे योग्य नाही. या संपामुळे ग्राहकांची अडचण होईल, असं आवाहन कर्मचाऱ्यांना केलं होतं.

Comment here