City News

औरंगाबाद : इच्छुकांचे प्रभागरचना आराखड्याकडे लक्ष

औरंगाबाद : महापालिका प्रभाग रचनेचा आराखड्याचे बुधवारी (ता.१५) राज्य निवडणूक आयोगासमोर सादरीकरण होणार आहे. या आराखड्याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान यावेळीच शहरात अडीच लाखाहून अधिक मतदारांची वाढ झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत या नव मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महापालिकेची आगामी निवडणूक प्रभागरचनेनुसार होणे निश्‍चित झाले आहे. यामुळे आता नगरसेवकांची संख्या ११५ वरून १२६ एवढी होणार आहे. यामुळे इच्छुकांच्या राजकीय आकांक्षांना घुमारे फुटले आहेत. एप्रिल २०२० मध्ये होणारी मनपाची सार्वत्रिक निवडणूक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडली आहे, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. राज्य आयोगाने प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्याचे महापालिकेला दिले असून त्यानुसार या आराखड्याचे सादरीकरण होणार आहे.दरम्यान, वॉर्ड रचना तयार करून तीन वॉर्डांचा एक प्रभाग या पद्धतीने प्रभागरचना करण्यात आलेली आहे. १२६ वॉर्ड विचारात घेता ४२ प्रभाग झाले आहेत. विद्यमान वॉर्डातूनच वॉर्डाची संख्या वाढली आहे. काही ठिकाणी वॉर्डाच्या सीमा कमी करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या वॉर्डात कुठपर्यंत सीमा आहेत, त्या आपल्यासाठी सोयीच्या आहेत का याकडे सध्या इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

Comment here