State News

‘जात-धर्मभेद मिटवायचे असेल तर बाबासाहेबांच्या विचारसरणीची गरज’

पुणे : आजचा दिवस भारताच्या इतिहासात महत्वाचा दिवस आहे. बाबासाहेब आमच्या देशात जन्मले त्याचा अभिमान वाटतो. पण, आज देशाला कशाची गरज आहे? बाबासाहेबासारख्या नागरिकाची आवश्यकता आहे. आज देशातून जात, धर्म, भेद मिटवायचे असेल तर बाबासाहेबांची विचारसरणी गरजेची आहे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. आज ते सिम्बॉयसिस संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आजचा दिवस कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे. भारतीय नागरिकांनी देशासाठी आणि समाजासाठी कसं काम केलं पाहिजे याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणतं विशेषण वापरावं हा प्रश्न पडतो. ते हुशार होते, बुद्धीमान होते, कर्तव्यनिष्ठ होते. त्यांनी आयुष्यात किती डिग्री घेतल्या आहेत. बाबासाहेब आमच्या देशात जन्मले त्याचा अभिमान वाटतो. आज देशाला कशाची गरज आहे? बाबासाहेबांसारख्या नागरिकाची आवश्यकता आहे. आज देशातून जात, धर्म, भेद मिटवायचे असेल तर बाबासाहेबांची विचारसरणी गरजेची आहे. आज या महाविद्यालयातून बाहेर जाणारी विचारसरणी आत्मनिर्भर भारताची असेल. भारत माझा देश आहे, असं म्हणणारे नागरिक भारतात असावे. त्यांना परमपुज्य बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांगताना गर्व वाटायला पाहिजे, असेही राणे म्हणाले.

मराठा आरक्षणावरून साधला विरोधकांवर निशाणा –
”बाबासाहेबांनी त्यांच्या आय़ुष्यात जे काम केलं त्याचं कौतुक सर्वत्र होते. मराठा आरक्षणाबाबत आंदोलनं झाली. विरोधकांनी तेव्हाच्या फडणवीस सरकारवर फार टीका केली. हे आरक्षण घटनेत बसत नाही, असं म्हटलं. त्यावेळी तज्ज्ञांना विचारले, की हे घटनेत बसतं की नाही? त्यावेळी त्यांनी मला घटनेचं कलम सांगितलं. १५(४) आणि १६(४) कलमामध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत आणि ते फडणवीसांनी दिलं होतं. सर्वांना न्याय देणारी घटना बाबासाहेबांनी दिली. त्यामुळे बाबासाहेबांचं कौतुक करायला माझ्याजवळचे शब्द कमी पडतील. त्यांच्यासाठी कोणती विशेषण वापरावी? हे मला समजत नाही. त्यांचे कार्य खूप महान आहे.”

आत्मनिर्भर भारतासाठी बनण्यासाठी बाबासाहेबांचे विचार महत्वाचे –
केरळसारखं राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा शंभर टक्के साक्षर आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण करून देश समृद्ध करा. आमचा देश भारत महासत्ता आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी बाबासाहेबांचे विचार महत्वाचे आहेत, असंही नारायण राणे म्हणाले.

Comment here