State News

नारायण राणे आज पोलिसांसमोर हजर राहणार का?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी राणेंची जामिनीवर सुटका झाली असली मुक्तता अद्याप झालेली नाही. महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांना सशर्त जामीन दिला होता. न्यायालयाने राणे यांना 30 ऑगस्ट रोजी अलिबाग पोलिसांत हजेरी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार नारायण राणे आज अलिबाग पोलिसांत हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद आणि चर्चा रंगली होती. याच्याच दुसऱ्या अंकाला आजपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, नारायण राणे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बोलवणं आल्यामळे राणे तात्काळ दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे अलिबाग येथे नारायण राणे हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात विधान केल्यानंतर शिवसैनिक संतापले होते. राज्यातील विविध पोलिसांत तक्रार आणि गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी कारवाई करत राणेंना अटक केली होती. त्यानंतर राणेंना सशर्त जामीन मंजूर झाला होता. राज्यात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पेटला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

जामीन देताना कोर्टाने काय म्हटले होते?

15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन मिळाला आहे. अटकेसाठी पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पार न पाडल्यानं जामीन मिळाला. 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी नारायण राणे यांना रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. नारायण राणेंनी साक्षीदारांवर दबाव टाकू नये, राणेंना आपल्या आवाजाचे नमुने सादर करावे लागणार नारायण राणेंनी पुराव्यांशी छेडछाड करु नये.

Comment here