State News

भाजप नगरसेवकांच्या मनगटावर शिवबंधन बांधणार? एकनाथ खडसेंच्या होमग्राऊंडवर संजय राऊतांची एण्ट्री

जळगाव: शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आज जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सुरुवातीला ते जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Mahanagarpalika) नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळी महापालिकेशी निगडित प्रश्न, निधीची उपलब्धता, गटतट यासारख्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (Shivsena MP Sanjay Raut will hold party meeting in Jalgaon) दरम्यान, या बैठकीत शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या भाजप नगरसेवकांच्या विषयावरही खल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी भाजपच्या नगरसेवकांचा संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना प्रवेश होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. नगरसेवकांच्या बैठकीनंतर जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत, विलास पारकर आदींसह पदाधिकारी उपस्थित असतील.

जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर
याआधी, जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत (Jalgaon Mayor election) शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला.

मुक्ताईनगरमधील नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश
दरम्यान, मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दहा आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं होतं.

Comment here