Business & AuctionsCity News

आता करा ‘गुगल पे’वरुनच एफडी…पण कोणत्या बँकेत? जाणून घ्या

गुगल पे ग्राहक आता मुदत ठेवीवर (FD) व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (Equitas Small Finance Bank) ‘गुगल पे’वर एफडी केल्यास व्याज दर देत आहे. यासाठी वापरकर्त्याला बँक खाते उघडण्याची गरज नाही. इक्विटोस बँक फिनटेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवायडर सेतूकडून तयार केलेल्या API द्वारे ही सुविधा प्रदान करत आहे.

डिपॉझिट पुर्णतः डिजिटल

इक्विटास एसएफबीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ग्राहक गूगल पे अॅपद्वारे चांगल्या व्याजदरावर डिजिटल पद्धतीने एफडी करू शकतात. यासाठी ग्राहकाला इक्विटोस बँकेत बचत खाते उघडण्याची गरज नाही. एक वर्षाच्या मुदत ठेवीवर (1-year FD) 6.35 टक्के व्याज मिळवू शकता असे बँकेचे म्हणणे आहे. हे व्याजदर इतर अनेक बचत पर्यायांपेक्षा जास्त असल्याचेही बँकेचे म्हणणे आहे.इक्विटास एसएफबी ही एक आरबीआय शेड्यूल्ड कमर्शियल बँक आहे. त्यामुळे ग्राहकाची मुदत ठेव (FD) ठेव हमी (Deposit Guarantee) अंतर्गत समाविष्ट केली जाईल. ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ (DICGC) कायद्यांतर्गत बँकांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा विमा उतरवला जातो. जर बँक बुडाली तर 5 लाख रुपयांच्या दाव्याची (claim) रक्कम डीआयसीजीसी ग्राहकाला देते.

गुगल पेवर एफडी कशी करावी ?

गुगल पेवर FD करण्यासाठी, वापरकर्त्याला ‘बिझनेस अँड बिल्स’ विभागात जावे लागेल आणि इक्विटोस बँकेचा शोध घ्यावा लागेल. यानंतर, वापरकर्त्याला मुदत ठेवीची रक्कम आणि कालावधी निवडावा लागतो. यासाठी त्यांना वैयक्तिक आणि केवायसी (know your customer) तपशील द्यावा लागेल. यानंतर पेमेंट गूगल पे यूपीआय द्वारे ( Google Pay UPI) पूर्ण करावे लागेल. ही सुविधा गुगल पे वापरकर्त्यांच्या अँड्रॉइड अॅपवर उपलब्ध असेल.मुदत ठेवीच्या (FD) परिपक्वतेनंतर (Maturity) मिळालेली रक्कम गुगल पे वापरकर्त्यांच्या विद्यमान गुगल पे सोबत लिंक असलेल्या खात्यावर हस्तांतरित (Transfer) केली जाईल. वापरकर्ते त्यांच्या ठेवींचा मागोवा (Track) घेऊ शकतात. तुम्ही अकाली पैसे (Premature withdrawal) काढू शकता. अकाली पैसे काढण्यासाठी अर्ज करता त्याच दिवशी बँक खात्यात पैसे पोहोचतील.

Comment here