City NewsHealth & Fitness::Cardio

पुणे : लसीकरण केंद्र पुन्हा गजबजली

पुणे : ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटमुळे शहरातील लसीकरण केंद्रांवर पुन्हा पुणेकरांची पावले वळू लागली आहेत. यापैकी बहुतांश जण हे दुसऱ्या डोससाठी येत असून, पहिला डोस घेणाऱ्यांचीही संख्या गेल्या चार दिवसांपासून वाढली असल्याचे निरीक्षण केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी नोंदविले आहे.

पुण्यात एप्रिलपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यानंतर शहरातील कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत लसीकरणाचा हा वेग सातत्याने वाढत होता. या दरम्यान बहुतांश पुणेकरांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला. त्याला आता तीन महिने झाले आहेत.
त्यामुळे दुसऱ्या डोस घेणारेही पुन्हा लसीकरण केंद्रांकडे वळले आहेत. त्यातही खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांऐवजी महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या लसीकरण केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी नोंदविले.

शहरात ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचा रुग्ण आढळल्यानंतर ही प्रतिबंध लस घेण्यासाठी आता पुन्हा केंद्रांवर गर्दी वाढत आहेत. एकट्या मालतीबाई काची प्रसुतीगृहातील (गाडीखाना) केंद्रात दोनशेच्यावर पुणेकरांनी कोविशिल्डची लस घेतली, असेही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबद्दल महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘शहरात गेल्या २९ नोव्हेंबरपासून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सप्टेंबरमध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचा आता दुसरा डोस सुरू आहे. तसेच, ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे आतापर्यंत पहिला डोस न घेतलेले नागरिकही केंद्रावर येत असल्याचे दिसते आहे.’’

Comment here