State News

पवारांना प्रशांत किशोर भेटले

मुंबई: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. या आधाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट… विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची घेतलेली भेट आणि पवारांनी मधल्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली कथित भेट… यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. एका राजकीय भेटीचे राजकीय अर्थ काढले जात नाही तोच दुसऱ्या राजकीय भेटीचं वृत्त येऊन धडकत आहे. त्यामुळे नव्या समीकरणाची पुन्हा पुन्हा चर्चा होताना दिसत आहे. या भेटीगाठींमागील नेमकी कारणं काय आहेत? पडद्यामागे नक्की काय सुरू आहे? याचा घेतलेला हा आढावा. (pm modi-uddhav meeting, sharad pawar-prashant kishor meeting, Massive speculation in maharashtra politics)

1) पवार-प्रशांत किशोर यांची सदिच्छा भेट; पण साडेतीन तास खल
कुणाच्या ध्यानीमनी नसतानाच आज राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या घरी या दोघांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. दुपारचं जेवण घेत या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलावून घेतलं होतं. ते पाऊणतास या बैठकीत होते. ते गेल्यानंतरही पवार-प्रशांत किशोर यांच्यात चर्चा सुरू होती. या भेटीत 2024ची लोकसभा निवडणूक, देशपातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार, बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील फॅक्टर, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोट बांधणे, बंगाल मॉडेल आणि मविआ मॉडेल देशभर लागू करणे आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत किशोर यांनी एनसीपीसाठी काम करावं अशी इच्छा व्यक्त केली होती. पण पवार पारंपारिक राजकारण सोडायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेतली नाही. मात्र, बंगालमध्ये प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केलेले दावे आणि ममता बॅनर्जींसाठी आखलेली रणनीती यामुळे ममतादीदींना मोठं यश आलं. त्याची देशभर चर्चा झाल्याने प्रशांत किशोर कोणतीही लाट परतवून लावू शकतात, यावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळेच पवारांनी आज प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली असावी असं सांगितलं जात आहे. अर्धा तास ही बैठक चालेल असं वाटत असताना बैठक साडे तीन तास चालली. एवढंच नव्हे तर पवारांनी थेट किशोर यांच्यासोबत दुपारचं जेवण घेत, जेवणाच्या टेबलवरही त्यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी नंबर वन होण्यापासून ते सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात प्रमोट करण्यापासून ते तिसऱ्या आघाडीचं भवितव्य, तिसऱ्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा, काँग्रेस आणि राहुल गांधींचं भवितव्य, डावे पक्ष, नितीश कुमार आदी विविध विषयांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. प्रशांत किशोर यांनी यापुढे राजकीय रणनीती आखण्याचं काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी भाजपला डॅमेज करण्याची संधी ते सोडणार नाहीत. पवारांसारख्या नेत्याला भाजपला डॅमेज करण्याचे तंत्र सांगण्यासाठी तर ते सिल्व्हर ओकला आले नव्हते ना?, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

2) मुख्यमंत्री-मोदींचे ‘बंददाराआड’ खलबतं
दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. या शिष्टमंडळाने मोदींशी पावणे दोन तास चर्चा केली. या पावणे दोन तासातील अर्धा तास मोदी-ठाकरे यांची बंददाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना या एकांतातील भेटीबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा मी मोदींनाच भेटायला गेलो होतो. नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, असं उत्तर ठाकरेंनी दिलं. मोदी आणि आमचं नातं घट्ट असल्याचंही ते म्हणाले. त्यातून त्यांना जो राजकीय संकेत द्यायचा तो त्यांनी दिला. पण मोदींसोबतच्या वैयक्तिक भेटीत कशावर चर्चा झाली हे मात्र त्यांनी अजिबात कळू दिलं नाही. या भेटीत मोदींनी उद्धव ठाकरेंशी जुळवून घेण्यावर अधिक भर दिल्याचं बोललं जात आहे. या भेटीबाबत बरेच कयास लावले जात आहेत. मात्र, ठोस असं काही बोललं जात नाही. परंतु, आगामी काळात देशात आणि राज्यात राजकीय घटना घडामोडी जसजशा घडतील तेव्हाच या अर्ध्या तासाच्या भेटीचा अन्वयार्थ लावला जाऊ शकतो, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

Comment here