मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत ही भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा मागील 9 महिन्यांपासून प्रलंबित आहे. या मुद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात गेले काही दिवस संघर्ष सुरू होता. त्यामुळे, या भेटीतून तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या काही नावांबाबत राज्यपालांनी आक्षेप घेतलाय. त्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार हा संघर्ष आहे. राज्यपालांनी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्या नावाला आक्षेप घेतला असल्याचं समजतेय.
मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी या नावांबाबत राज्यपालांचे आक्षेप आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला कशी काय मान्यता द्यावी, असा प्रश्न राज्यपालांच्या कार्यालयासमोर आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कोट्यातून शिफारस करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नावावरही आक्षेप आहेत. विविध आंदोलनात शेट्टी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर फेरविचार करण्याची सूचना राज्यपाल देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून राजू शेट्टी यांचं नाव वगळण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला असला तरी तरीही ते सरकार विरोधात पदयात्रा करत आहेत. त्यामुळे त्यांचं नाव वगळण्यात आल्याचं सांगितलं जातेय. राष्ट्रवादी काँग्रेस कडून हेमंत टकले यांचं नाव देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने कुणाचा पत्ता कट केलाय? याची चर्चा सुरु आहे.
Comment here