जत्राट(बेळगाव): चार दिवसापासून परिसरात कडाक्याचे उन्ह पडत आहे. त्याचा तंबाखू लावणीवर परिणाम झाला असून तंबाखू उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. महापूर, अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील वीज खांब व ट्रान्सफार्मर कोसळल्याने ते दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे नदीकाठावरील वीज पुरवठा खंडीत केला आहे. वेदगंगा नदी दुथडी भरून वाहत असली तरी वीज पुरवठा नसल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांना तंबाखू लावणीसाठी टँकरने पाणी आणावे लागत आहे. सलग दोन वर्षे शेतकऱ्यांना कोरोना व महापुराचा फटका सहन करावा लागत आहे. यंदा अतिवृष्टी व महापुराने तंबाखू लावणीसाठी शेतकऱ्यांनी गादी वाफ्यावर टाकलेले तंबाखूचे तरुची (रोपे) उगवण झाली नाही. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना दुबार तरू टाकावे लागले. ते मागास झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी बाड, करजगा, कणगला या भागातून तंबाखूचे तरु आणून लावणी उरकून घेतल्या. तंबाखू लावणी अंतिम टप्प्यात असतानाच चार दिवसापासून कडाक्याचे उन्ह पडू लागले आहे. त्यामुळे सकाळी लावण केलेले तरु (रोप) कोमेजू लागले आहे.उन्हामुळे तंबाखू लावणीसाठी जास्त पाणी लागत असून केवळ पाणी आणण्यासाठी पाच मजुरांना ठेवावे लागत आहे. पाणीही लांबून आणावे लागत असल्याने मजुरांचे हाल होत आहेत. गतवर्षी जत्राट भागात केवळ 60 एकर तंबाखू लावण झाली होती. यंदा महापुराने सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्या रिकाम्या क्षेत्रातही तंबाखू लावण होत आहे. यंदा 150 एकरात तंबाखू लावण होणार असून 100 एकर लावण पूर्ण झाली आहे. उर्वरित लावण सुरु असून उन्हाचा अडसर येत आहे. परिसरात 500 ते 600 रुपये हजारी तंबाखू तरुची विक्री केली जात आहे.
तंबाखू लावणीसाठी मजुरी कमी असल्यामुळे ग्रामीण भागात आजही लावणीसाठी पैरा पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे तंबाखू लावणी उरकण्यास चांगलीच मदत होत आहे. पैरा पद्धतीने तंबाखू लावण गतीने होत आहेत.
`उर्वरित तंबाखू लावणीची कामे गतीने सुरु झाली आहेत. मात्र दोन दिवसापासून कडाक्याचे उन्ह पडत आहे. त्यामुळे लावण केलेली रोपे कोमेजू लागली आहेत. तसेच लावणीसाठी पाणीही जास्त लागत आहे. त्यामुळे अडचणी येत आहेत.`
Comment here