पुणे : जगभरात पु्न्हा चिंतेचं वातावरण निर्माण करणाऱ्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्यातच कोरोनाकाळात सर्वाधिक संसर्गबाधित असलेल्या पुणे शहरात आता दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली आहेत. त्यामुळे पुणेकरांची धाकधूक वाढली आहे.
पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, “दक्षिण अफ्रिकेतून पुण्यामध्ये एक प्रवाशी दाखल झाला असून त्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसत आहेत. पण अद्याप या व्यक्तीचा तपासणी अहवाल समोर आलेला नाही, तो आल्यानंतर याबाबत नक्की काय ते सांगता येईल”
दरम्यान, कालच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक माहिती दिली होती. गेल्या दहा नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून जवळपास एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, असं त्यांनी सांगितलं होतं. हे सर्व प्रवासी फक्त मुंबईतच नव्हे तर मुंबईतून इतर शहरात देखील गेले आहेत. त्यामुळं मुंबईत एकूण किती प्रवासी आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात किती प्रवासी गेले आहेत, याची छाननी सध्या सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सध्या सुरु आहे. त्यांना फोन करुन, त्यांचे पत्ते मिळवून त्यांना संपर्क साधण्यात येतो आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते.
डोंबिवलीत केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्रासह राज्य सरकार सतर्कता बाळगत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावलीतयार करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
दक्षिण अफ्रिकेतून पुण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं!

Comment here