नांदेड जिल्ह्यातला लेंडी सिंचन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं, चालू वर्षात ३०० कोटी रूपये अतिरिक्त देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. ते आज नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकल्पाला सन २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये प्रतीवर्षी ४०० कोटी रुपये निधी देऊन, सन २०२४ मध्ये प्रकल्प पूर्ण केला जाईल, असं ते म्हणाले.
पूर्णा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांसाठी मध्य गोदावरी खोऱ्यात २.८ टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्धता शासनानं नुकतीच मंजूर केली असून या पाण्यातून पूर्णा नदीवरील ४ उच्च पातळी बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासनस्तरावर तातडीने निर्णय घेण्यात येईल अशी माहितीही पाटील यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीवरील नवीन ६ उच्च पातळी बंधारे तसेच माहूर शहरास पाणी पुरवठा करावयाच्या दृष्टिनं, धनोडा उच्च पातळी बंधाऱ्यांचा समावेश उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या ६ व्या सुधारित अंदाजपत्रकात करण्यात येऊन त्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला अशी माहितीही त्यांनी दिली.
यामुळे ९ हजार ३१० हेक्टर क्षेत्रास लाभ होऊन माहूर, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड या परिसरातील ५० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
Comment here