साओ पावलो : ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना बुधवारी साओ पावलो येथील अलबर्ट एईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना मोठ्या आतड्याचा कॅन्सर असल्याने त्यावर केमेथेरपी करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
प्रवक्त्यांनी पेले (Pele) यांच्या प्रकृतीबाबत बोलताना सांगितले की, ‘त्यांची प्रकृती स्थीर आहे आणि त्यांना येत्या काही दिवसात रुग्णलायातून सुट्टी मिळेल.’ पेले यांचे वय ८१ वर्षाचे आहेत. त्यांच्या मोठ्या आतड्यातील ट्युमरवर सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यावेळी पेले यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ज्यावेळी मार्ग खडतर असतो त्यावेळी या प्रवासातील प्रत्येक पावलाचा आनंद घ्या. तुमच्या आनंदावर लक्ष केंद्रीत करा. हे खरं आहे की मी आता उड्या मारु शकत नाही. मात्र या दिवसात मी अनेकवेळा विजय साजरा केला आहे. तुम्ही पाठवलेल्या संदेशांनी माझे आयुष्य परिपूर्ण झाले आहे. तुमच्या प्रेमासाठी आभार.’ अशी पोस्ट केली होती.
पेले यांनी ब्राझीलला तीन वेळा वर्ल्डकप जिंकून दिला होता. त्यांनी १९५८ वर्ल्डकपमध्ये युवा फुटबॉलपटू म्हणून खेळले होते. मात्र निवृत्तीनंतरही त्यांच्यावरील चाहत्यांचे प्रेम कमी झालेले नाही. फिफाने २००० मध्ये पेलेंना प्लेयर ऑफ द सेंच्युरी पुरस्कार दिला होता. पेले यांना हा पुरस्कार अर्जेंटिनाच्या डिएगो मॅराडोना यांच्याबरोबर विभागून देण्यात आला होता.
गेल्या वर्षी पेले यांची प्रकृती खालावली होती. ते मानसिक तणावात असल्याचे वृत्तही आले होते. मात्र त्यांनी आपण शस्त्रक्रियेनंतर मानसिक तणावात असल्याचे वृत्त फेटाळले होते.
Comment here