ममता बॅनर्जी यांच्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्याने तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधान आलं आहे. त्यानंतर काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीच्या चर्चांवर आज शिवसेनेचे मुखपत्र ‘सामाना’ने अग्रलेखातून भाष्य केलं आहे. काँग्रेसला विरोध करणे म्हणजे भाजपचे हात बळकट करणे असं म्हणत काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीवर सामनातून टीका करण्यात आली आहे. त्यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
भाजपविरोधी आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी ममता बॅनर्जी सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्याचं दिसतं आहे. त्यावर भाष्य करताना सामानामध्ये नेतृत्व करण्याचा अधिकार कुणाला याचं उत्तर वेळ देईल, सध्या भाजप विरोधात पर्याय उभं करणं महत्वाचं आहे असं म्हणत, काँग्रेसला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सामनाच्या संपादकांचे नेते आता बदलले असल्याचं सांगितलं. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हेच सामनाच्या संपादकांचे नेते असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, “दैवी अधिकारांचा घोळ!” या शीर्षकाखालील सामनाच्या अग्रलेखात ममता बॅनर्जींसह प्रशांत किशोर यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे. युपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाला हे येणारा काळ ठरवेल असे म्हणत या अग्रलेखातून काँग्रेस शिवाय तिसऱ्या आघाडीच्या मुद्याला विरोध केल्याचं दिसून येतंय. दैवी अधिकार कुणाला हे वेळ ठरवेल पण सध्या भाजप विरोधात पर्याय तर उभा करा असं आवाहन सर्व विरोधीपक्षांना या माध्यमातून करण्यात आलंय.
काँग्रेस आज कठीण काळातून जात आहे, मात्र उताराला लागलेली गाडी वर चढूच द्यायची नाही हा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचे मत या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. तसेत काँग्रेसला घरचा आहेर देणाऱ्या जी-२३ नेत्यांचा समाचार घेताना, ज्या लोकांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख, चैन, सत्ता उपभोगली तेच आता काँग्रेसचा गळा घोटता आहेत असा शाब्दिक हल्ला चढवण्यात आलाय.
Comment here