लखनऊ : कोरोनाचा (coronavirus) नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’ (omicron) ने अवघ्या जगभरात दहशत माजवली आहे. याचा प्रादुर्भाव पाहता उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊ (lucknow) शहरामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.
लखनऊमध्ये कलम 144 लागू
लखनऊमध्ये घराबाहेर पडताना मास्क वापरणं बंधनकारक झालं आहे. तसेच बंद ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमामध्ये १०० हून अधिक लोकांची उपस्थिती असणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असं आदेशात म्हटलं आहे. हे आदेश ५ जानेवारी २०२२ पर्यंत असतील असं सांगण्यात आलं आहे. शहरामधील रेस्तराँ, हॉटेल, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, व्यायामशाळा, मैदाने यासारख्या गोष्टी ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच शहरामध्ये मास्कची सक्ती करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर शांतता भंग करणाऱ्या पोस्ट टाकू नयेत
शहरामध्ये रात्री १० नंतर लाउडस्पीकर्सवर बंदी घालण्यात आलीय. सरकारी कार्यालयांच्या आसपास ड्रोनने शुटींग करण्यास बंदी घालण्यात आलीय. घराच्या छप्परावर दगड, विटा तसेच ज्वलनशील पदार्थ ठेवू नये असं सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर शांतता भंग करणाऱ्या पोस्ट टाकू नयेत असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणारी जेसीपी पीयूष मोर्डिया यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सर्व ठिकाणी करोना नियमांचं योग्य पद्धतीने पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. विधानसभेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यावर बंधनं घालण्यात आली आहेत. रेस्तराँ, हॉटेल, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, व्यायामशाळा, मैदाने ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी असल्याचं सांगण्यात आलंय.
Comment here