तिवसा (अमरावती) : शिवसेनेच्या तिवसा शहरप्रमुखाची काल (26 जून) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. या शहरप्रमुखाचं नाव अमोल पाटील असं होतं. तो दारु पिण्यासाठी तिवसा येथील एका वाईन शॉपमध्ये गेला होता. या वाईन शॉपसमोर हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये अमोल पाटील याचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या अवघ्या काही तासात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे
अमोल पाटील याच्यावर दोन जणांच्या हत्येचा आरोप अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा बसस्थानक जवळ आशीर्वाद वाईन शॉपसमोर काल (26 जून) रात्री हत्येची घटना घडली. शिवसेनेचा तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील याची जुन्या वादातून डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. अमोल पाटील याच्यावर यापूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता. तसेच दीड महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी पसार झाला आहे.
डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राने हत्या
अमोल जनार्दन पाटील (वय 38) असे मृतकाचे पूर्ण नाव आहे. तो शिवसेना शहर प्रमुख होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अमोल पाटील हा आपल्या एका मित्रांसोबत दारू पिण्यासाठी आशीर्वाद बारमध्ये आला होता. पण आरोपींनी अमोल पाटील याच्या हत्येचा आधीच कट रचला होता. आरोपींनी अमोलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले.
पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळावर मिळालेल्या काही माहिती आणि पुराव्यांच्या आधारावर तपासाची चक्र फिरवले.
त्यानंतर अवघ्या काही तासातच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक करण्यात आली. अजूनही एक आरोपी पसार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी दिली आहे. या प्रकरणातील आरोपी सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Comment here