श्रीनगर : पाकिस्तानने श्रीनगर- शारजा या थेट विमानसेवेसाठी त्यांच्या हवाई हद्दीचा वापर करण्यास विरोध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गेल्या आठवड्यातील जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यात या मार्गाचे उद्घाटन झाले होते. ‘गो फर्स्ट’ या स्वस्त दरातील विमान कंपनीतर्फे या नव्या मार्गावर २३ ऑक्टोबर रोजी वाहतूक सुरु झाली.
पाकिस्तानच्या या निर्णयाची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय यांना कळविण्यात आल्याचे बुधवारी सांगण्यात आले. २००९मध्येही पाकिस्तानने श्रीनगर-दुबई विमानांसाठी त्यांची हवाई हद्द वापरण्यास मनाई केली होती. त्यानंतर या मार्गावर मागणी कमी असल्याने ही सेवा बंद करण्यात आली होती. त्याचीच पुनरावृत्ती पाकिस्तानने आता केली आहे.
विमान प्रवासाचा मागोवा ठेवणाऱ्या ‘रडार २४’ दिलेल्या माहितीनुसार श्रीनगर- शारजा मार्गावरील विमाने ३० ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानच्या हद्दीतून गेली. मात्र मंगळवारी (ता.२ नोव्हेंबर) विमान राजस्थान व गुजरातवरून उडाले. आता ही ही विमानसेवा दिवसाआड सुरू राहणार आहे, असे ‘गो फर्स्ट’ने सांगितले.
* बंदीचे परिणाम
– श्रीनगरहून उड्डाण केल्यानंतर विमानांना उदयपूर, अहमदाबाद आणि ओमानमार्गे शारजाला जावे लागणार
– प्रवासाचा कालावधी एक तासाने वाढणार
– इंधनावरील खर्च वाढेल. यातून तिकीट दरात वाढ झाल्यास त्याचा बोजा प्रवाशांवर पडणार
”आवश्यक तयारी न करताच केंद्र सरकारने या विमानसेवेला परवानगी दिली आहे. या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्यासाठी त्या देशाची परवानगी घेण्याकडे सरकारने केलेले दुर्लक्ष हे कोड्यात टाकणारे आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केलेले या सेवेचे उद्घाटन म्हणजे जाहिरीतबाजी होती ”.(मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर)
पाकिस्तानचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. २००९-१०मध्ये श्रीनगर- दुबई या ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’च्या विमानसाठीही पाकिस्तानने असेच केले होते.-(उमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर)
Comment here