नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता कुठे शमण्याची चिन्हे तयार झाली आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या गोंधळामुळे काँग्रेसमधील संघटनात्मक अव्यवस्थेचं प्रदर्शन जगाला घडून आलं. नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो आता १८ दिवसांनी अखेर त्यांनी मागे घेतला आहे. आपली नाराजी व्यक्त करत राजीनामास्त्र उगारलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी काल शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी आता राजीनाम्याचा आपला निर्णय मागे घेत पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबलं आहे.त्यांनी आपल्याला वाटत असलेली काळजी, विचार मी राहुल गांधींसमोर मांडले असून आता सर्व काही ठीक झालंय, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केलीय. याबाबत पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी माहिती दिली. “हायकमांडला मी माझ्या मनात असणारी खदखद आणि काळजी सांगितली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी जो काही निर्णय घेतील तो पंजाबच्या भल्यासाठी असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्यांनी सर्वोच्च मानत असून त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे,” असं सिद्धू यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितलं.पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंतर्ग धूसफूस सुरु होती. त्यानंतर एके दिवशी अचानकच मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामागे सिद्धूंचाच हात असल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं. यानंतर तरी पंजाब काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल होईल, असं वाटत असतानाच पुन्हा एकदा सिद्धू यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या अचानक राजीनामा देण्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर आता सिद्धू काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देतील, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र काल दसऱ्याच्या मुहुर्तावर राहुल गांधी यांची भेट घेत सिद्धू यांनी राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलंय.
त्यांच्या या भेटीबद्दल माहिती देताना हरीश रावत यांनी म्हटलंय की, “सिद्धू यांनी आपले मुद्दे राहुल गांधींसमोर मांडले आहेत. यावेळी त्यांना या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल, असं सांगण्यात आलं. यावेळी त्यांनी राजीनामा मागे घेत पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली जाईल असं आश्वासन दिलं,”
Comment here