औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेत मेहनत घेऊनही अवघ्या एका गुणाने अपयश आल्याने नैराश्यातून युवकाने गळफास घेतला. किशोर भटू जाधव (२८, रा. मूळ वाघाडी खुर्द ता. शिंदखेडा, सध्या पुष्पनगरी, औरंगाबाद) असे युवकाचे नाव आहे. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास किशोरने गच्चीवरील खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. मागील सहा वर्षांपासून किशोर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी धाव घेत किशोरचा मृतदेह घाटीत हलविला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किशोरला मृत घोषित केले.
आदल्या रात्रीच वडिलांशी झाले होते बोलणे
किशोरचे वडील भटू जाधव हे वाघाडीखुर्द गट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून शेती करतात. त्यांना तीन मुले आहेत. किशोरचा मोठा भाऊ विकास हा पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. लहान भाऊ चेतन नागपूर येथील उच्च न्यायालयात लिपिक आहे. किशोर हा द्वितीय मुलगा होता. किशोर व चेतन अविवाहित आहेत. औरंगाबाद येथे बाबा पेट्रोल पंप जवळील वसाहतीत किशोर दोन मित्रांसोबत राहत होता. नुकताच लोकसेवा आयोगाच्या निकालात गुणवत्ता यादीत नाव न आल्याने तो अतिशय निराश झाला. रात्री त्याने वडिलांना खुशाली विचारली होती. मात्र त्याने सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे माहीत झाल्यावर आई निर्जला व वडिलांनी एकच हंबरडा फोडला.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
किशोरने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये मित्र-मैत्रिणीसोबतच्या आर्थिक व्यवहारातून त्याला पैसे मिळाले नसल्याचे नमूद आहे. त्याला मानसिक त्रास दिल्याचेही चिठ्ठीत लिहिले आहे. तसेच या प्रकरणातील सात ते आठ जणांची नावे असल्याची माहिती विशेष पथकाचे उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक शिरके करत आहेत. किशोर हा सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा तो दोनदा उत्तीर्ण झाला होता.
मात्र, निकषाहून उंची थोडी कमी भरल्याने दोन्हीवेळा संधी हुकली. त्यावेळी तो निराश झाला नाही. अन्य स्पर्धा परीक्षेत राज्यात २६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली होती. मात्र, क्लास वन बनण्याचे ध्येय बाळगून असल्याने त्याने ती नोकरी स्वीकारली नाही. एसटीआयच्या पहिल्या परीक्षेतही त्याने यश मिळविले आणि आता मुख्य परीक्षेची तयारी करीत होता. फेब्रुवारी२०२१ मध्ये दिल्ली येथे वर्ग एक पदासाठी त्याने मुलाखत दिलेली आहे. मात्र त्याचा निकाल अजून लागलेला नाही. अशा कष्टाळू युवकाचा असा मृत्यू झाल्याने अवघे गाव सुन्न झाले आहे.
Comment here