औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो १८ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने कच्चा आराखडा तयार केला आहे; पण महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय सध्या दौऱ्यावर असल्याने कच्चा आराखडा पाठविण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मिळावा, असे पत्र महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. दरम्यान, राज्य शासनाने मुंबई वगळता इतर महापालिकांच्या निवडणुका त्रिसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला.
तसेच शहराच्या वाढीव लोकसंख्येनुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णयही नुकताच घेण्यात आला आहे. त्यानुसार ४२ प्रभाग आणि १२६ नगरसेवक महापालिकेत राहणार आहेत. त्याचा कच्चा आराखडा तयार करून १८ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी समिती स्थापन केली. या समितीने प्रभागरचनेसह वॉर्ड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचे मंगळवारी (ता. १६) सांगण्यात आले होते.
मात्र प्रभागरचनेचा कच्चा आराखडा प्रशासकांच्या सहीने पाठविणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासक पांडेय हे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आयोजित प्रशिक्षणासाठी स्पेनला गेले आहेत. त्यामुळे आयोगाला पत्र पाठवून दहा दिवसांचा वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रशासक शहरात आल्यानंतरच महापालिकेच्या प्रभागरचनेचा कच्चा आराखडा अंतिम होणार आहे.
औरंगाबाद : कच्च्या आराखड्यासाठी मागितला दहा दिवसांचा वेळ

Comment here