City NewsHealth & Fitness::Cardio

औरंगाबाद : कोरोनाबाधित तिप्पटीने वाढण्याची शक्यता

औरंगाबाद : कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, तिसरी लाट येणार हे स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेतील बाधितांचे आकडे पाहता तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या तिप्पट असेल, अशी शक्यता लक्षात घेऊन महापालिकेतर्फे तयारी केली जात आहे. रुग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्यू कमी असल्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या होम आयसोलेशनला प्राधान्य दिले जाईल, तसेच बंद झालेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
शहरात पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णवाढीचा हा वेग तिप्पट आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. पाच) प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली व तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची रणनीती ठरवली. बैठकीनंतर अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितले की, पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या तिप्पटीने वाढेल असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यानुसार तयारी केली जात आहे. महापालिकेकडे असलेले सर्व ऑक्सिजन सिलिंडर्स भरून ठेवले जाणार आहेत. पाच हजार रुग्णांना पुरतील एवढी औषधी व अन्य साधनसामग्रीदेखील आरोग्य विभागाकडे उपलब्ध असेल, महापालिका खासगी डॉक्टरांची देखील मदत घेईल.
संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन सर्वच्या सर्व १९ कोविड केअर सेंटर्स सुरु करण्याचा निर्णयदेखील बैठकीत घेण्यात आला. त्यापैकी किलेअर्क (३०० खाटा), एमआयटी कॉलेजचे दोन वसतिगृह (प्रत्येकी ३७५ व १७५ खाटा), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह (४५० खाटा), देवगिरी महाविद्यालयाचे मुलामुलींचे वसतिगृह (४८० खाटा), आयएचएम कॉलेजचे वसतिगृह (८० खाटा) ही पाच कोविड केअर सेंटर्स लगेचच सुरु केली जाणार आहेत. चाचण्यांचे प्रमाण देखील वाढवले जाणार असून त्यासाठी आयएमए या संस्थेसह काही सेवाभावी संस्थांची मदत देखील घेतली जाणार आहे.

कॉल सेंटर सुरू होणार

ज्यांना त्रास नाही अशा बाधितांना होमआयसोलेशनमध्ये ठेवण्याकडे महापालिकेचा कल असेल. कॉल सेंटर सुरु करून होमआयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांशी डॉक्टर संपर्क साधतील. रुग्णांची स्थिती बघून त्यांना दवाखान्यात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याबद्दल डॉक्टर निर्णय घेतील. कॉल सेंटरसाठी दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय अन्यही रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या जातील असे श्री. नेमाने यांनी सांगितले.

Comment here