औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने एक डिसेंबरपासून पहिलीच्या पुढील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. त्याअनुषंगाने ग्रामीण भागात शाळा सुरु झाल्या. मात्र, शहरातील शाळा सुरु करण्यास दहा डिसेंबरनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने कळविले. त्यामुळे पालक, बालक आणि शिक्षकही अस्वस्थ झाले आहेत. शाळेत येण्यासाठी अजून किती दिवस वाट पहावी लागणार? असा सवाल विद्यार्थी पालक करीत आहे.
डिसेंबरच्या एक तारखेला शाळा सुरू होणार म्हणून पालकांनी मुलांना गणवेश, नवीन दप्तर खरेदी केले. रिक्षा, स्कूलबस अशा सर्व बाबींची तयारी केली. एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद होता. प्रदीर्घ सुटीनंतर शाळा सुरू होणार असल्याने पालक आणि बालकांबरोबर शिक्षकही समाधानी दिसत होते. मुलांना केंद्रबिंदू मानून शिक्षक कार्यरत असतात. शाळा सुरू झाली पाहिजे, असे सर्वांना वाटत होते. त्याबाबत एकदाचा निर्णय झाला ही बाब सर्वांसाठी समाधानकारक होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जाणार होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने एक तारखेला शाळा सुरु न करता १० तारखेनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असा निर्णय घेतल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. दरम्यान, शाळा प्रशासनाबरोबर स्कूल बस, चालक आणि रिक्षाचालकांनीही स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. बसमधील आसनांची सफाई, बस, रिक्षाची सर्व्हिसिंग केली होती. मात्र, आता ही प्रक्रिया थंडावली आहे.
“घरात बसून मुलं कंटाळली आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरु होतात, मग शहरातील का बंद ठेवल्यात? मुलगा तिसरीत गेला आहे, तरी अद्याप त्याने शाळेचे तोंड पाहिले नाही. एक डिसेंबरपासून शाळा सुरु होणार म्हणून सर्व तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी मनपा प्रशासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबविला. त्यामुळे मुलं नाराज झाली.”
– विलास जाधव, पालक
“मोबाईलवर ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. मोठा दादा शाळेत दररोज जातो. आल्यानंतर घरात आम्ही एकत्र खेळतो. तेव्हा कोरोना नाही होत का? आम्हाला शाळेत जाऊन प्रत्यक्ष शिकता येणारच नाही का? आम्हाला स्वतःची काळजी घेता येते. त्यामुळे शहरातील शाळा लवकर सुरु कराव्या.”
Comment here