केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना अत्रौली येथे अंतिम श्रद्धांजली वाहिली. कल्याण सिंग यांच्या मृत्यूमुळे आपल्या पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनामुळे आपल्या पक्षाने लढाऊ वृत्ती असलेले आघाडीचे एक नेते आणि देशातील, विशेषतः उत्तर प्रदेशातील गरीब आणि उपेक्षित जनतेने त्यांचे हितचिंतक व्यक्तिमत्वदेखील गमावले आहे, असे शहा म्हणाले. केंद्रीय गृह मंत्र्यांनी सांगितले की कल्याण सिंग रामजन्मभूमी चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते आणि या चळवळीसाठी सत्तात्याग करताना त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही.
उत्तर प्रदेशच्या विकासासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले. उत्तर प्रदेशाला देशातील सर्वात उत्तम राज्य म्हणून घडविण्यासाठी त्यांनी नेहमीच अथकपणे काम केले असे शहा यांनी सांगितले. केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की बाबूजींच्या मृत्यूमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात विशेषतः आमच्या पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, आणि येत्या काळात ती लवकर भरून निघणे खूप कठीण आहे.
कल्याण सिंग यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचे जीवन, पक्ष कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्त्रोत बनून राहो अशी प्रार्थना अमित शहा यांनी केली.
Comment here