उंड्री : नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र बंद केल्यामुळे महागड्या आणि खर्च खासगी रुग्णालयात नागरिकांना उपचार घ्यावे लागत आहेत. मयत पास घेण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील लोकसंख्या सुमारे १० लाखांच्या आसपास आहे. पालिका प्रशासनाने येथील नागरिकांसाठी पूर्वी असलेल्या जि.प.च्या आरोग्य केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, होळकरवाडी, औताडेवाडी, शेवाळेवाडी या गावातील नागरिकांना मयतचा पास ग्रामपंचायतीकडून मिळत होते. मात्र, आता गावे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केली आहेत. येथील नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये मयताचा पास घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रे होती, त्या ठिकाणी पालिका प्रशसानाने आरोग्य सेवा उपलब्ध करावी. प्रशासन नागरिकांच्या सोयीसाठी आहे की, गैरसोसीसाठी आहे, असा संतप्त सवाल राजेंद्र भिंताडे, बबन मोहिते, राहुल मासाळ, सचिन पुणेकर, प्रफुल्ल कदम, वसंतराव कड यांनी उपस्थित केला आहे.
हडपसरमधील महापालिकेच्या अण्णासाहेब मगर रुग्णालयातील ओपीडीमध्ये मागिल १६ नोव्हेंबर २०२१ पासून ओपीडीच्या वेळेत मयत पास मिळत आहे. सायंकाळी सहानंतर या ठिकाणी पास केंद्र बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना वानवडी किंवा पुण्यातील ससून रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या नियमानुसार आधार कार्डाची साक्षांकित प्रत जोडावी लागते. मात्र, साक्षांकित प्रत काढण्यासाठी रात्रीच्या वेळी झेरॉक्सची दुकाने बंद असतात.
घरामध्ये दुःखद प्रसंग आणि त्यात प्रशासनाकडून कागदपत्रांसाठी अडवणूक केली जाते, त्यामुळे चिडचिड होऊन मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने साक्षांकित प्रत काढण्याची व्यवस्था करून नागरिकांची गैरसोय दूर केली पाहिजे. उंड्री, औताडेवाडी, वडाचीवाडी, उरुळी देवाची या गावातील नागरिकांना मयताचा पास घेण्यासाठी हडपसरमधील पालिकेच्या अण्णासाहेब मगर रुग्णालयात यावे लागते. मात्र, सायंकाळी रुग्णालय बंद झाल्यानंतर पास मिळत नसल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, आरोग्यप्रमुखांशी याबाबत सविस्तर चर्चा करून मयत व्यक्तीचा पास त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा जवळच्या महापालिकेच्या दवाखान्यामध्ये देण्याचे नियोजन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Comment here