Sports

टी-20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा धमाका; सेमीच्या पहिल्या पेपरमध्ये पास

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने स्फोटक फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकानंतर पंत आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित षटकात 210 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 7 बाद 144 धावांपर्यंत मजल मारु शकला. टीम इंडियाकडून शमीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.अश्विनला 2 आणि बुमराह आणि जाडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघ अडचणीत आला असला तरी सेमीफायनलचे दरवाजे अजूनही टीम इंडियासाठी खुले होऊ शकतात. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी विजय नोंदवत रनरेट पॉझिटिव्हमध्ये नेले आहे. त्यामुळे गुंतागुतीच्या समीकरणातील सेमीच्या पहिल्या पेपरमध्ये टीम इंडिया पास झालीये असेच म्हणावे लागेल. उर्वरित दोन सामन्यात अशाच पद्धतीने उत्तम नेट रन रेटनं विजय नोंदण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत अबूधाबीच्या मैदानातून मिळाले आहेत. स्पर्धेतील पहिला विजय भारतीय चाहत्यांच्या आशा पल्लवित करणारा असा आहे.
सुपर 12 च्या दुसऱ्या गटातून पाकिस्तानच्या संघाने सेमीफायनल पक्की केली आहे. या गटातून दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात शर्यत आहे. यात न्यूझीलंडचा संघ प्रबळ दावेदार आहे. कारण उर्वरित सर्व सामने जिंकून ते सेमी फायनलचे तिकीट मिळवू शकतात. दुसरीकडे जर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभवाचा दणका दिला तर भारतीय संघाच्या आशा पुन्हा पल्लवित होतील. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ही लढत 7 नोव्हेंबरला रंगणार आहे. या सामन्यानंतर या गटातील दुसरा सेमी फायनलिस्ट कोण हे चित्र जवळपास स्पष्ट होईल.

Comment here