बीड, 6 जून : सरपण घेऊन शेतातून घरी येत असलेल्या पती-पत्नीचा विद्युत वायरला चिटकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील जरुड गावात घडली. वैजिनाथ शामराव बरडे ( वय ३० ) आणि त्यांची पत्नी शोभा वैजिनाथ बरडे ( रा . वय ३०) अशी मयतांची नावे आहेत. या दाम्पत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व वीज चोरून वापरणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने बरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर वीजेचा करंट लागून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण गेल्या अनेक दिवसात वाढले आहे.
बीड तालुक्यातील जरुड येथे शेतातून सरपण घेऊन घरी चाललेल्या वैजिनाथ शामराव बरडे आणि त्यांची पत्नी शोभा वैजिनाथ बरडे हे शेतातील रस्त्याने जात असताना शोभा यांचा पाय वायरवर पडल्यामुळे त्यांना शॉक लागून त्या खाली कोसळल्या. त्यावेळी वैजिनाथ यांना पत्नी खाली का पडली ? हे न समजल्यामुळे त्यांनी पत्नीला उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील शॉक लागल्याने दोघांचाही यात मृत्यू झाला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेप्रमुख भुतेकर, पीएसआय खरात, पीएसआय सानप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर नातेवाईकांनी चोरून आकडा टाकणारे रामकिसन विश्वनाथ काकडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मयत वैजिनाथ बरडे यांचा मुलगा अक्षय बरडे याच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम 304 प्रमाणे आरोपी रामकिसन विश्वनाथ काकडे यांच्या विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादळी वारा आणि पाऊस यामुळे बऱ्याच वेळा विद्युत तारा आणि वायर तुटून पडलेली लक्षात न आल्याने असे अपघात ग्रामीण भागात घडत असतात म्हणून प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
Comment here