राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक Nawab Malik यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्याविषयीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप Anurag Kashyap हा समीर वानखेडेंवर अनेक आरोप करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत अनुरागने वानखेडेंबद्दल वक्तव्य केलं होतं.
काय म्हणाला अनुराग कश्यप?
“समीर वानखेडेंना बॉलिवूडला टार्गेट करायला आवडतं. त्याने दोन वर्षे माझी बँक खाती गोठवली होती. हे प्रकरण मी जेव्हा न्यायालयात नेलं, तेव्हा सुनावणीच्या १५ मिनिटांआधी माझी बँक खाती व्यवहारासाठी खुली करण्यात आली. तुम्ही नीट अभ्यास केला तर समजेल की बॉलिवूडच्या अनेक प्रकरणांमध्ये या व्यक्तीचं नाव आहे. मूळ प्रश्नांपासून लक्ष भरकटवण्यासाठी समीर वानखेडेचा वापर केला जातोय”, असं अनुराग या मुलाखतीत म्हणाला.
सीमाशुल्क विभागात काम करत असताना वानखेडे अनेक सेलिब्रिटींना परकीय चलनात खरेदी केलेल्या सामानाची माहिती उघड केल्याशिवाय आणि त्यावरील योग्य तो कर भरल्याशिवाय कस्टमची मंजुरी दिली नव्हती. कर न भरल्याबद्दल त्यांनी दोन हजारहून अधिक सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केला होता. २०१३ मध्ये वानखेडे यांनी गायक मिका सिंगला मुंबई विमानतळावर विदेशी चलनासह पकडलं होतं. याशिवाय अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. २०११ मध्ये कस्टम ड्युटी भरण्यासाठी त्यांनी मुंबई विमानतळावर सोन्याची क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफी अडवली होती. ती भरल्यानंतर त्यांनी विमानतळावरून नेण्यासाठी परवानगी आली.
Comment here