नागपूर : नागपूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फॅशन डिझायनर महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वेब सीरिज पाहून तरुणीने डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक कोटी रुपये न दिल्यास मुलांचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी आरोपी महिलेने दिली होती. फॅशन डिझायनर शीतल इटनकर या महिलेला बुधवारी पोलिसांनी अटक केली. नागपूरमधील बेलतरोडी पोलसांनी ही कारवाई केली.
एक कोटी रुपयांची खंडणी
शीतलने कुरिअरच्या माध्यमातून डॉक्टर दाम्पत्याला पत्र पाठवत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अकोट यांच्या नेतृत्वात बेलतरोडी पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली. शीतलला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
डॉ. पांडे दाम्पत्याचे नागपुरात मॅटर्निटी होम आहे. 11 जूनला संध्याकाळी त्यांना कुरिअरने एक पत्र आलं. एक कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास आणि पोलिसांना कळवल्यास मुलांचं अपहरण करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी अज्ञात अपहरणकर्त्यांनी दिली होती. 17 जूनला मनिष नगर भागातील कचरा कुंडीजवळ बॅगेत पैसे ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. डॉक्टरांनी न घाबरता पोलिसांना याविषयी माहिती दिली.
पोलिसांनी कसा शोध लावला?
पोलिसांनी कुरिअर ऑफिसच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. यावेळी, मध्यमवयीन महिला दुचाकीने कुरिअर देण्यासाठी आल्याचं त्यांना समजलं. दुचाकीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरुन पोलिसांनी महिलेचं लोकेशन शोधून काढलं. त्यानंतर तिला बेड्या ठोकून तिची दुचाकीही जप्त केली.
वेब सीरीज पाहून अपहरणाची योजना
आरोपी शीतल इटनकर ही डॉ. पांडे यांची पेशंट असल्याचं समोर आलं. शीतल आणि तिच्या पतीवर डॉक्टरांनी कोरोना काळात उपचारही केले होते. शीतल इटनकरला दोन मुली आहेत. फॅशन बुटीक सुरु करण्यासाठी पैसे हवे असल्यामुळे तिने खंडणी मागितल्याची माहिती आहे. वेब सीरीज पाहून तिने अपहरणाची योजना आखली होती, असं तपासात पुढे आलं.
Comment here