नाशिक : सध्या शहर व परिसरात विवाहसोहळे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने त्यातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळू नये म्हणून महापालिकेने अचानक लॉन्सची तपासणी करण्यासाठी अठरा भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. विनामास्क आढळलेल्या व्यक्तींना जागेवर पाचशे रुपये दंड, तर लॉन्सला सील ठोकण्याची कारवाई केली जाणार आहे. कोरोना पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळू शकते.
तिसरी लाट थोपविताना बाजारातील उलाढाल कायम ठेवायची असेल तर शासनाने ठरवून दिलेल्या तीन नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. कोरोना दुसरी लाट जवळपास ओसरल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, थंडीच्या कालावधीमध्ये तिसरी लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.
सध्या लग्नसराई सुरू झाल्याने मंगल कार्यालये, लॉन्स गजबजले आहे. परंतु, या ठिकाणीदेखील कोरोना नियमांचे पालन होत नाही. विनामास्क नागरिक फिरताना दिसत असल्याने महापालिका प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी पुन्हा दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर व परिसरातील मंगल कार्यालये, लॉन्समधील विवाहसोहळ्यांना अचानक भेटी दिल्या जाणार असून, तेथे तपासणी होणार आहे.
अठरा पथकांची नियुक्ती सहा विभागात सहा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या प्रत्येकी तीन, असे एकूण अठरा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये दंड, तर मंगल कार्यालय, लॉन्समध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास पहिल्या टप्प्यात पाच हजार रुपये दंड दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास सील ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विवाहसोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने तपासणी सत्र राबविले जाणार आहे. विनामास्क पाचशे रुपये दंड, तर लॉन्स, मंगल कार्यालयांना सील ठोकले जाणार आहे.
– कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.
Comment here