Nashik, 5 June. महापालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड पार्किंगच्या नावाखाली घशात घालण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. गंजमाळ चौकातील मोकळी जागा सर्वसमावेशक आरक्षणाच्या नावाखाली विकसित करण्याचा घाट घातला जात आहे. महापालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड पार्किंगच्या नावाखाली घशात घालण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. गंजमाळ चौकातील मोकळी जागा सर्वसमावेशक आरक्षणाच्या नावाखाली विकसित करण्याचा घाट घातला जात असून, त्यासाठी एका बड्या बिल्डरशी भाजप नेत्यांशी परस्पर चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रक्रियेला शिवसेनेने विरोध केला असून ए. आर. संबंधित आरक्षण मंजूर केल्यास शिवसेना स्टाइल धडा शिकवण्याचा इशारा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिला आहे. गंगापूर रोडवरील प्रकरण ताजे असतानाच गंजमाळ येथील प्रकरणामुळे भाजपची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
महापालिका क्षेत्रात पार्किंगच्या जागा समावेशक आरक्षण अर्थातच ए.आर.च्या नावाखाली पदरात पाडून घेतल्या जातात. त्या विकसित करताना मात्र पार्किंग कोपऱ्यात आणि छोटीशी उभी करायची आणि त्यावर मार्केट उभे करून मोठा आर्थिक लाभ मिळवण्याचे रॅकेट गंगापूर रोडवरील भाजी मार्केटवरून समोर आले आहे. तोच प्रकार आता गंजमाळ येथील कोट्यवधीच्या मोकळ्या जागेबाबत सुरू झाला आहे. पार्किंगचे आरक्षण ए.आर.खाली विकसित करू नये, यासाठी २००६ मध्ये बोरस्ते यांनी पाठपुरावा केला होता. त्या वेळी पाठपुरावा केल्यानंतर महासभेने पार्किंगची व्यवस्था करताना ए.आर.च्या धोरणाखाली विकसित करू नये, असा निर्णय घेतला होता. याबाबत सरकारकडे तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू आहे. कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएल ऑफिसशेजारची इमारत व मुंबई नाका येथील शताब्दी रुग्णालयाखालील ‘एआर’खालील वाहनतळे पडून असून, त्यांची दयनीय अवस्था आहे. पार्किंगचा वापर होत नाही. मात्र विकासक कोट्यधीश झाले आहेत. गंजमाळ चौकातील मोक्याची जागा कोट्यवधी रुपयांची आहे. संबंधित आरक्षित जागेबाबत न्यायप्रविष्ठ वाद असल्याच्या तक्रारी असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी बोरस्ते यांनी केली आहे. हा प्रस्ताव बिल्डरधार्जिणा आहे, तसेच यामागे एका बड्या भाजप पदाधिकाऱ्याचा हात आहे. त्यामुळे परस्पर एआरखाली संबंधित आरक्षण मंजूर केल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन केले जाईल, असे बोरस्ते यांनी स्पष्ट केले.
Comment here