पुणे – कोरोनाशी सामना करत असतानाही अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करणाऱ्या शहरांसाठी ग्लोबल मेयर्स स्पर्धा घेण्यात आली. ‘ग्लोबल : २०२१ मेयर्स चॅलेंज’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याचा समावेश झाला आहे. ‘ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपीज’च्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ९९ देशांतील ६३१ शहरांनी अर्ज केले होते. त्यातील पहिल्या ५० शहरांत पुण्याचा समावेश आहे. शहराच्या वतीने ‘इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाया’ ही योजना ‘२०२१ : ग्लोबल मेयर्स चॅलेंज चॅम्पियन सिटीज’ या स्पर्धेत सादर केली आहे. यातील हवामान आणि वातावरण या घटकांतर्गत पुण्याची निवड झाली आहे.
स्पर्धेची अंतिम फेरी जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होईल. आणि यातून अंतिम १५ शहरांची निवड होईल. यात निवड होणाऱ्या प्रत्येक शहराला त्यांच्या संकल्पनांची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी तांत्रिक साहाय्य दिले जाणार आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना ब्लूम्बर्ग फिलाँथ्रॉपीजचे संस्थापक मायकेल ब्लूम्बर्ग म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटात आव्हानांचा सामना करताना असताना अनेक शहरे धाडसी, नावीन्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापुढील काही महिन्यांमध्ये या शहरांना त्यांच्या संकल्पनांची चाचणी करण्यास मदत केल्याने शहरे अधिक सामर्थ्यवान होतील. आत्यंतिक प्रगत धोरणे व कार्यक्रम स्वीकारून ते अमलात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन लाभेल.’’
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘पुण्याच्या ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ या संकल्पनेची अंतिम स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल ‘ब्लूम्बर्ग’चे आभार. पुणे शहर हे देशातील वास्तव्यासाठी सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योग यांचे केंद्र आहे. पुण्याने भक्कम नागरी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. परंतु, शहराच्या वाढत्या विस्तारामुळे प्रदूषणामध्येही वाढ झाली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचा महापालिकेचा संकल्प आहे.’’
Comment here