पुणे : राज्यातील आणि शहरातील कोरोना रूग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १ डिसेंबर म्हणजेच उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुण्यातील पहिली ते आठवीच्या शाळा उद्यापासून नव्हे तर १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तत्पूर्वी मुंबईतील शाळादेखील उद्याऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील शाळांमधील सर्व वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. मात्र मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्यानंतर मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा उद्यापासून सुरू न करता 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात याव्यात असा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरू होईपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा १५ डिसेबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पुणे शहरातील शाळा कधीपासून सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, आता पुणे शहरातील पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग उद्यापासून सुरू न होता ते आता १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे पालक आणि शाळा प्रशासनामध्ये असलेल्या संभ्रमावर पूर्णविराम लागला आहे.
पुणे : शाळांची घंटा १५ डिसेंबरला वाजणार

Comment here